ADVERTISE

Wednesday 22 March 2023

आदिवासींचा कल्पवृक्ष मोहाचे झाड.................

 

मोहाची फुले 



आदिवासींचा कल्पवृक्ष मोहाचे झाड

गडचिरोली  जिल्ह्यात आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान म्हणून महत्व  आहे

आदिवासी समूह तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मोहाच्या झाडांच्या भोवती फिरते याबाबत दुमत जरी असले तरी ते खरे आहे .

शास्त्रीय नाव:Madhuca longifoliaमधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया ) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष. जिल्ह्यातील जंगलात वनप्रदेशानजीक राहणाऱ्या आदिवासींसाठी हा वृक्ष वरदान ठरला आहे. सातपुडा,चिरोली पर्वतातील जंगलात मोहाची झाडे आढळतात. त्याची फुले, फळे, पाने, साल, लाकूड, मुळे, फांद्या या सर्व अवयवांचा उपयोग होत असल्याने हे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरते आहे. मोह हा डेरेदार वृक्ष आहे. तो ४० ते ६० फूट उंच वाढतो. मोहाचे झाड ६० ते ७० वर्षांपर्यंत जगते. गाभ्यातील लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड खूप कठीण सरळ असते. फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान मोहाची पाने झडतात होळीचा सण झाला की लगेचच मोहाची फुलं पडायला लागतात . कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह इथल्या आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच, फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग तयार केला जातो.

मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात.

      औद्योगिक महत्व


मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. त्यामध्ये '' जीवनसत्त्व असते. एक टन फुलांपासून सुमारे ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. इंजिनचे इंधन म्हणून या अल्कोहोलचा उपयोग होतो. व्हिनेगर बनवण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. विविध उपयोगांसाठी मोहाच्या फुलांना मागणी आहे. फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मोहाची फुले बहरतात. त्यामध्ये ६७.९% अल्कोहोलचे प्रमाण असते. , मेणबत्ती बनविण्यासाठी मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. धुण्याचा साबण तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो. मोहाच्या सालीत टॅनिन असते. या सालींचा उपयोग रंगासाठी करतात. या लाकडाच्या पाट्या चांगल्या बनत असल्यामुळे टेबल-खुर्ची अशी साधने बनवण्यासाठी सुद्धा मोहाचा वापर होतो


          औषधी गुणधर्म


मोहफुलात नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणात असते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि कॅल्शियम असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे
कोणत्याही आजारात काही आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात .मोहाच्या बियांचे तेलही काढले जाते. आदिवासी भाज्यांसाठी व दिव्यासाठी पूर्वी या तेलाचा वापर करायचे.  तेला पासून  बनविलेली भाजी चविष्ट खूप असते या तेलाचा त्वचारोग,अंग दुखी  व डोकेदुखीवरील विविध प्रकारच्या औषधांत उपयोग करण्यात येतो. तसेच. मोहाचे फुल पोष्टिक आहे;म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. मोहाने खोकला होत नाही. अलीकडे मोह "महुआ न्युट्रीबेव्हरेज' या प्रकल्पावर केंद्रसरकार काम करत आहे. मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो.    गायी किंवा बैलांचे शरीर सुद्धा मोहाच्या सालीने शेकले जाते.

शेतीतील महत्व


बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवितात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो. पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात, त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांची पेंड उत्तम सेंद्रिय खत असते. पेंडीचा धूर केल्यास साप व उपद्रवी किडे-कीटक पळतात, सर्पदंशावरही ते पेंडीचा उपयोग करतात. पाण्यातील माशांना भुलविण्यासाठी आदिवासी पाण्यात पेंडीचा भुसा टाकतात. मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या भागांतील शेतकरी गायी-गुरांना मोहाच्या पानांचा सकस आहार देतात. त्यामुळे दुभती जनावरे भरपूर दूध देतात. या सर्व लोकांच्या घरी विशेषता: शेतकरी, पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवल्या जातात. मासेमारीसाठी लागणारा डोंगा मोहाच्या लाकडाचा असतो आणि सोनार मोहाच्या कोळशावर सोने, चांदी ठेवून नळीने फुंकर घालीत असतात. लोहार तर नांगर पाजवताना मोहाचेच कोळसे घेऊन या असे आवर्जून सांगतो. मोहाच्या झाडाची मुळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरले जाते, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात. जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो. हे लाकूड लवकरच फुटते आणि लवकरच जळते त्याचमुळे याचा इंधन म्हणून सगळ्यात जास्त वापर होतो.

 

  रोजगाराचे उत्तम साधन



महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातलं देशी झाड असलेला मोह (Madhuca longifolia) या राज्यांमधलं महत्त्वाचं गौण वनोपज आहे. ट्रायफेडच्या माहितीनुसार मध्य प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातले सुमारे ७५% आदिवासी मोहोची फुलं वेचतात आणि त्यातून वर्षाला ५,०००  रुपयांची कमाई करतात.पानांचे द्रोण व पत्रावळी आदिवासी तयार करतात. लग्न व सणांच्या दिवशी या पत्रावळी व द्रोणांना चांगली मागणी असते. ५ ते १० रुपये शेकडा भाव मिळतो. मोहाचे लाकूड सागापेक्षाही कठीण असते. धागा व पेपर बनविण्यासाठी लागणारा लगदाही या लाकडाचा बनवितात. फर्निचर, नावा, बैलगाड्यांची चाके, छोटे छोटे लाकडी पूल, चहाची खोकी, घरांचे खांब व तुळ्यांसाठी मोहाच्या लाकडाचा उपयोग होतो. परंतु या कारणासाठी मोहाचे झाड सहसा तोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे पाने, फुले, फळे व बिया यांचे उत्पन्न मोह देतो. लाकडापेक्षा त्याचे हे इतर उत्पन्न अधिक महत्त्वाचे आहे.  मोहफुलांच्या सुमारे 90 टक्के वार्षिक उत्पादन हे पेय बनवण्यासाठी वापरले जाते. या बाबी लक्षात घेऊन आदिवासींच्या विकासासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाने (ट्रायफेड) राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेसोबत (एनआरडीस) "महुआ न्युट्रीबेव्हरेज' या पेयासंदर्भात करार केला आहे. ट्रायफेड आणि आयआयटी दिल्लीने या पेयाची निर्मिती केली आहे. या पेयाची निर्मिती करण्यासाठी आयआयटी दिल्लीने दोन वर्षे संशोधन केले आहे. सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याविषयी उद्योग उभारण्याचा सरकारचा विचार असून त्याद्वारे देशासह विदेशातही निर्यात केली जाणार असल्याचे समजते. केंद्र सरकारकडून याविषयी 500 ते 600 कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. विशेषतः अनुसूचित जाती/जमाती समूहातील युवकांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोहाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोण बनवले जातात. गावागावांत जंगलातून मोहाची पाने गोळा करून उन्हाळ्याच्या दिवसात लग्नकार्य इतर समारंभात विकल्या जातात आदिवासींना या पत्रावळी पासून मोठा रोजगार मिळतो.

धार्मिक ,सामजिक  व सांस्कृतिक महत्व


आदिवासी मोहाच्या झाडाला पवित्र समजून झाड तोडत नाहीत. जन्म, मृत्यू, विवाह, सणांच्या वेळी झाडाची पूजा करतात. या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात आदिवासी समुहांसाठी हे झाड मोठा देवआहे. याच झाडाखाली मुटम्या देवकिंवा मोठा देव मांडला जातो. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात रहिवासी म्हणतात की जंगलात झाडं तोडली तर त्यात मोहाच्या झाडाला शेवटपर्यंत कुणी हात लावत नाही. या जिल्ह्याच्या आदिवासींची या झाडावर श्रद्धा आहे कारण त्यांच्या मते हा वृक्ष कुणालाच उपाशी ठेवत नाही. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.

 

पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व


मोहाचे झाड अत्यंत उंच असल्याने आणि तप्त उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असल्याने या झाडाचे पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत मोठे महत्त्व आहे, अनेक प्राणी आणि पक्षी यांचा आश्रय म्हणजेच मोह आहे. मोहाच्या झाडावर अनेक वानर येऊन मोहफुले खातात आणि नशा आली की झाडावर धिंगाणा करतात. अस्वल, गावठी डुक्कर, रान डुक्कर, ससा, सांबर, नीलगाय, शेळ्या, गाई, बैल, हरीण हे सर्वच प्राणी मोहफुले खात असतात. या झाडाची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी इतर कोणत्याही झाडांपेक्षा जास्त आहे.

 

 

मोहाचे अनंत गुण आणि कार्य असताना मोह फक्त दारू साठी बदनाम करण्यात आलेला आहे. मोहामुळे आदिवासीची सुद्धा बदनाम केली जाते. खरे तर ते इतर समापेक्षा  जास्त सुसंस्कृत आहेत. मोहाची दारू पिऊन लोक गावात फिरत असतात. दारू शिवाय त्यांचे जीवनच चालत नाही.  जन्म होताना, लग्न होताना आणि मरताना सुद्धा दारू आदिवासींची सोबती आहे अस बोलल्या जात परंतु . त्याच गावात स्त्रिया रस्त्याने जात असताना, अगदी जंगलात सुद्धा अशा फिरत असताना, आदिवासींच्या परिसरात एखादा बलात्कार झाला, कुणीतरी एखाद्या स्त्रीची छेड काढली असे कधीच पहावयास मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी मोहाची दारू सुद्धा पाजली जात होती. तिने बळ येते व बाळांतीनचे शरीर गरम राहते.  लग्नात नवरदेव आणि नवरी मोहाच्या पाटावर किंवा पिढ्या वर बसलेले असतील, लग्नात मोवई चे  खांब केंद्रस्थानी लावले जाते, या खांबावर सुंदर नक्षी काढली जाते. 

    मोहापासून फक्त दारूच मिळते असे नाही.तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक कणा व  पर्यायाने कल्पवृक्षच आहे.....

मोह वृक्ष वाचविण्याची गरज .............

एवढं सगळं असताना महाराष्ट्रात मात्र आज महाराष्ट्रफॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या वतीने सरसकट मोहाची झाडे सुद्धा कापली जाऊन त्या ठिकाणी फक्त सागवन आणि बांबू लावला जातो, मागील काळात वडसा(गडचिरोली-चंद्रपुर सीमेगत) जवळील ११ गावांतील  सर्वच झाड सरसकट कापली गेली. गावातील गावकऱ्यांनी किमान मोहाची झाडे कापू नका, फळांची झाडे कापू नका अशा प्रकारची विनंती शासनाला केली. परंतु त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामसभा आता सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. ज्या सागवणाला लावले जाते त्याची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी किती? याचा आपण कधीच विचार करत नाहीशिवाय  प्रचंड लागणारा वनवा व वन  हक्क कायदा लागू झाल्या पासून बरेच जिल्हा वासीय शेती साठी जंगल तोड करत आहेत व परिणामी या कल्प वृक्षाच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे ......

No comments:

Post a Comment

  HIGHEST FOREST PERCENTAGE STATE IN INDIA ( भारतातील सर्वाधिक वन टक्केवारी असलेले राज्य ) वनांचे जागतिक महत्व  (What is the Importance of...