ADVERTISE

Wednesday 22 March 2023

पळसाचे झाड :रानातील पेटती ज्योत ...............

 

पळसाचे झाड :रानातील पेटती ज्योत ...............

न्हाळा सुरु झाला असला तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाच्या फुले रंग उधळताना दिसत आहेत.पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद दिसून सर्वांचे लक्ष वेधून घेते म्हणूनच इग्रजी मध्ये त्यास Flame of the forest म्हणतात ते उगी च नाही. आजही अनेक आदिवासी जमातींमध्ये पळसाला पुजतात कारण हा बहुपयोगी असल्याचे त्यांना माहित आहे. पांगाऱ्याचा जवळचा नातेवाईक असलेला हा पळस कालीदास असो की बहिणाबाई, सगळ्या उत्तम कवीना भुरळ घालतोच घालतो. या झाडावरुन नाव मिळालेलं एक इतिहास प्रसिद्ध शहर म्हणजे “पलाशी-पलासी- प्लासी. बंगालमधे झालेली ती सुप्रसिद्ध प्लासीची लढाई आपण शाळेत शिकलो आहोतच. या भागात आजही मुबलक पळस आढळतात. भाषेमध्ये किंशुक, रक्तपुष्पक असेही म्हणतात

वनस्पतीशास्त्रतील उल्लेख

शास्त्रीय नाव :वनस्पतीशास्त्रात बुटिया मोनोस्पर्मा [ Butea monosperma ]

कुळ: फ़ाबेसी [ Fabaceae ]


                ह्या कडधान्य कुळातील हा पर्णझडी वृक्ष आहे. भारतातील उष्ण व समशितोष्ण जंगलांमध्ये, विंध्य, सह्याद्री व हिमालयाच्या पायथ्याचे जंगल इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळतो. या शास्त्रिय नावातलं मोनोस्पर्मा या शब्दाचा अर्थ आहे एकच बी असलेला. पळसाच्या प्रत्येक शेंगेत एकच बी असते. या शेंगाना पळसपापडी असे म्हणतात. ह्या झाडाच्या बिया रुजायला साधारण १५ दिवस लागतात. पण गम्मत म्हणजे, वर्षापेक्षा जुन्या बिया रुजत नाहीत. साधारण ५ ते १५ मिटर्स पर्यंत उंच वाढणारा हा अगदी घनदाट या सदरात कधीच मोडत नाही. साधारण ५/६ मिटर्स व्यासात याचा पर्णसंभार पसरतो. हे कधीच झाड सरळ अथवा डेरेदार न वाढता, वेड्यावाकड्या आकारात वाढतं. याची साल तपकिरी करडट रंगाची नी तंतूमय म्हणजेच फ़ायब्रस असते. ही साल रखरखीत असते नी यातून कधीकधी चक्क लालसर रंगाचा चिक स्त्रवतो. या लालसर चिकापासून डिंक बनवला जातो. हा डिंकाला चुनियागोंद, कसरकस म्हणतात ज्याचा वापर कातडे कमवण्यासाठी केला जातो. आता ’पळसाला पाने तीन’ ही सुप्रसिद्ध म्हण ज्या पानांवरून जन्माला आलीय ती पानं कशी असतात? हा प्रश्न कुणाच्याही मनात लगेच डोकावू शकतो. ही पळसपानं मोठी, वातड जाड , एकांतरीत असतात. पानाचा देठ साधारण १५ सेमीपर्यंत वाढतो. या देठाला तेवढ्याच म्हणजे साधारण १० ते १५ सेमी लांबीच्या तीनच पर्णिका येतात. मधली पर्णिका कायम सगळ्यात मोठीच म्हणजे १५ ते २० सेमी लांब असते. बाकी दोन साधारण १० ते १५ सेमी असतात. ह्या पर्णिका ठळक काळपट हिरवट असतात. वनस्पतीशास्त्रानुसार, कुठेही हा वृक्ष उगवला तरी याला तीनच पर्णिका येतात. ह्यामुळेच कदाचीत ती म्हण जन्मली असेल. ळसाची फ़ुलं म्हणजे ह्या झाडाचा मानबिंदूच म्हणावा लागेल. साधारण थंडीच्या अखेरीस ह्या झाडाचं फ़ुलणं सुरु होतं. पण सह्याद्रीत, कोकणात तर चक्क हे झाड कित्येकदा नोव्हेंबरातच फ़ुलायला सुरुवात करतं. लाल रंगाच्या विविध छटांमधली ही फ़ुलं काही प्रमाणात वाकडी वळलेली असतात, अगदी पोपटाच्या चोचीसारखीच. घोसात येणाऱ्या या फ़ुलांचे तुरे साधारण ३५/४० सेमी लांब असतात. या फ़ुलांच्या पाकळ्या मोठ्या म्हणजे ६/७ सेमी असतात. याचा पुष्पकोष काहिसा मांसल काळपट मखमली रंगाचा असतो.या चित्ताकर्षक लाल रंगछटांच्या फ़ुलांमध्ये प्रत्येकी १० पुंकेसर असतात ज्यातले ९ जोडलेले असतात. फ़ुलाच्या तळाशी पाच मकरग्रंथी म्हणजेच नेक्टरीज असतात. यात तयार होणारा मधुरस प्यायला पक्षी,खारी नी भुंगे अगदी गर्दी करतात.माकडं तर फुलांच्या जोडीला या झाडाची कोवळी पानं आणि शेंगापण खातात. आपल्याकडे अनेक ठिकाणी या पळसाच्या जोडीला पिवळा पळसही फ़ुलतो. 

        उत्तरेकडे काही ठिकाणी चक्क पांढरा पळस फ़ुलल्याची नोंद आहे. उघड्या गवताळ रानात याचे शुद्ध समूह आढळतात. पळस या वृक्षाच्या वंशामध्ये 30 जाती आढळतात. यापैकी आपल्या भारत देशामध्ये फक्त तीन जाती आढळतात. ती म्हणजे केशरी किंवा लाल पळस, पिवळा पळस आणि पांढरा पळस. यापैकी केशरी व पिवळा पळस मुबलक प्रमाणात आढळतो. तर पांढरा पळस लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पिवळा पळस हा फार दुर्मिळ आहे. पांढरा आणि पिवळा पळस हा फार क्वचित प्रमाणात आढळतो. आणि यामुळे उत्सुकतेपोटी या झाडांची मुळापासून तोड होते. संपूर्ण जगामध्ये फक्त भारतातच आपणास हा पळस आढळून येतो. हिमालय किंवा राजस्थानच्या वाळवंटामध्ये हा पळस आढळत नाही. पिवळ्या पळसाबद्दल अंधश्रद्धा देखील आहे. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलाचा उपयोग केला जातो असा समज आहे. आणि यामुळेच जादूटोणा करणाऱ्यांना नेहमीच या झाडाची ओढ असते. ही जरी अंधश्रद्धा असली तरीही या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच असते. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. 

लागवड व्यवस्थापन :

जमीन व हवामान :लागवडीसाठी मुरमाड, हलकी ते मध्यम निचऱ्याची जमीन चांगली उपयुक्त ठरते. या वृक्षाच्या वाढीसाठी उष्ण व समशितोष्ण हवामान पोषक आहे.

अभिवृद्धी व रोपवाटिका :  फेब्रुवारी-मार्च महिन्यात फुले येऊन बियाणे एप्रिल-जूनपर्यंत परिपक्व होते. असे बियाणे गोळा करावे. ते एक वर्षापर्यंत उगवते. लागवडीपूर्वी नाण्यासारखे चपटे बियाणे २-३ तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा ९० टक्क्यांपर्यंत मिळतो. बियाणे पेरल्यानंतर उगविण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागतो. रोपे शेडनेटमध्ये केल्यास चार महिन्यांच्या कालावधीत १ ते २ फूट उंचीची होतात. पिवळा पळस व लाल पळसाची रोपे या प्रकल्पाकडे उपलब्ध आहेत.

लागवड ५x५ मीटर अंतरावर करावी.

योग्य प्रकारे खत व्यवस्थापन व आगीपासून रक्षण केल्यास ही झाडे चांगली वाढतात.

 

उपयोग

पळसाचे बहुतेक सर्व भाग उपयोगीच आहेत त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात .आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.पानांच उपयोग द्रोण , गुरांना चारा म्हणुन केला जातो. अनेक आयुर्वेदीक औषधे, जनावरांना चारा, खाण्यात वापर, लाकडाचे सरपण, पानांच्या पत्रावळी द्रोण, रंगपंचमीसाठी फ़ुलाचा नैसर्गिक रंग, मुळापासून, सालीपासून दोरखंड असे एक ना अनेक उपयोग ह्या झाडाचे आहेत. या झाडाच्या बियांपासून बनवलेलं किनो ऒइल औद्योगिक वापरात उपयोगाच आहे. मला आठवतय, देहेराडूनला शिकत असताना, होस्टेलवर असणारी पंजाबी मंडळी डोळ्यांत घालायला ढाकांदे जडोंदा तेल वापरायची. नंतर नंतर कळलं की हे ढाक दे जड म्हणजे चक्क पळसाची मुळं आहेत. मध्य भारतात, याचा अगदी नियमित होणारा वापर म्हणजे, बिडी ओढण्यासाठी याची पानं वापरली जातात. पळसाच्या फुलांपासून रंग बनवण्याचा देखील बनवला जातो. तसेच ग्रामीण भागात पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठीही केला जातो. मुळाचा वापर धागे बनविण्यासाठी केला जातो. त्यापासून दोरखंडे बनविली जातात.

औषधी गुणधर्म


याची फुले काही औषधांमधेही वापरली जातात त्यामुळे बाहेरच्या देशात खास औषधांकरता या वृक्षाची लागवड केली जाते. पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत. मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल. साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होईल आणि मूत्रपिंडातील स्टोनसुद्धा वितळतील. साखर न घालताही तुम्ही हे सूप बनवू शकता, ज्यामुळे यकृतासंबंधी समस्याही दूर होतील. मुरगळ, जळजळ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारी सूज दूर करण्यास मदत होते. त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील पळस प्रभावी आहे. पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे. पळसाच्या फुलांची पावडर यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होते.

पळसाच्या पानांचा उपयोग 

  •  मध्यप्रदेशातील एका आदिवासी  समाजामध्ये पाणीया नावाची एक विशेष भाकरी केली जाते. ही भाकरी बनवण्यासाठी पोळपाटावर किंवा समान पृष्ठभागावर पळसाची पाने अंथरली जातात. आणि मग त्यावर लाटण्याने पोळी लाटली जाते. मग लाटलेल्या पोळीला दोन्ही बाजूंनी पळसाची पाने व्यवस्थित लावली जातात. मग याला गायीच्या शेना पासून बनवलेल्या गोवरऱ्यावर भाजले जाते. पळसाच्या पानांचा धुर आणि गोवर्यां यांच्या धुरा वरील या भाकरी म्हणजेच पाणीया चांगल्या चवदार होतात. 
  •  पळसाच्या पानांचा पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची जुनी पद्धत आहे. पळसाच्या पानांच्या पत्रावळी वर गरमागरम अन्न वाढली की त्या अन्नाबरोबर पळसाचेही औषधी गुणधर्म पोटात जावेत असा उद्देश आहे. 
  •    पळसा चा पाला हा जनावरांना आणि हत्तींना खायला घालतात. 
  •    बंगालमध्ये पळसाची पाने बिडी बांधण्यासाठी वापरतात. 
  •   पडसे व खोकला यावर गुणकारी औषध म्हणून पळसाचा सौम्य काढा घेतला जातो. 
  •    किडनीच्या विकारावर पळस हा अतिशय उपयुक्त आहे. 
  •    किडनीच्या विकारांवर पळसाची फुले शिजवून ते पाणी उपयुक्त आहे. 


धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

या वृक्षांमध्ये पळस देखील महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. वास्तूनुसार पळस वृक्षात त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) वास करतात. माता लक्ष्मीला पळसाची फुले खूप प्रिय आहेत. पळसाच्या फुलांना तेसू फुले असेही म्हणतात. हे फूल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच याचे चमत्कारी उपाय देखील आहेत. याला ब्रम्हदेवाचं झाड मानल्याने धर्मिक महत्व आहेच. यज्ञ कार्यात अग्नित वापरल्या जाणाऱ्या समिधा याच झाडाच्या लाकडाच्या असतात. मौंजीबंधनात म्हणजेच मुंजीत मुलाच्या हातात दिली जाणारी काठी/ दंड ह्याच झाडाची असते. आजही अनेक आदिवासी जमातींमध्ये पळसाला पुजतात कारण हा बहुपयोगी असल्याचे त्यांना माहित आहे. पांगाऱ्याचा जवळचा नातेवाईक असलेला हा पळस कालीदास असो की बहिणाबाई, सगळ्या उत्तम कवीना भुरळ घालतोच घालतो. रामायणात देखील पळसाच्या वनाचा व त्याच्या फुलांचा उल्लेख केलेला आढळून येतो. पांढरा पळस हा तंत्र विद्या मध्ये वापरला जातो असा समज आहे. आणि कदाचित याच कारणामुळे किंवा अतिरिक्त तोडीमुळे आपल्याला तो जंगलामध्ये पाहावयास मिळतो. पांढरा पळस हा एक चमत्कारी वृक्ष मानला जातो. हे वृक्ष दुर्मिळ प्रजातीचे आहेत. तज्ञांच्या मते पांढरा पळस या वृक्षाची मध्यप्रदेश मध्ये फक्त दोन झाडे आहेत. या झाडाच्या विविध अंगांचा उपयोग तंत्र मंत्र मध्ये केला जातो असा एक अंधविश्वास रूढ झाला आहे. आणि यामुळे हा वृक्ष लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 

विशिष्ट उपयोग व लागवड

लाखेचे किडे वाढविण्यास पळसाचे झाड फाड चांगले असते म्हणून त्या वृक्षांची लागवडही करतात. पळसाचे मळे सुक्या (रुक्ष) जागी पाणभरत्या जागी पिकविता येतात. पावसापूर्वी शिंबा गोळा करून त्या चऱ्यांमध्ये ३-३.५ मी. अंतर ठेवून पेरतात. शेंगेतील ताजे बीज त्वरित रुजते; लाखेकरिता लावलेली झाडे सु. ६ मी. अंतरावर लावतात. मुळापासून निघणाऱ्या फुटव्यामुळे शाकीय उत्पादन (अभिवृद्धी) होते.

भारतात लाखेचे किडे पोसण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडांमध्ये कोशिंबाच्या खालोखाल पळसाचा क्रमांक लागतो, पळसावर वाढणाऱ्या किड्यांपासून मिळणाऱ्या लाखेची प्रत कमी असते, तथापि लाखेचे प्रमाण अधिक असते. याकरिता मेमध्ये वृक्षांची बुंध्याच्या वर छाटणी करून नंतर नवीन मांसल प्ररोह (कोंब) येऊ देतात; त्यांवर किडे पोसले गेल्यावर सर्वच नवीन फूट एकदम कापून घेता येते.

बहुधा ऑक्टोबर-नोव्हेंबरात लाखेचा पिलावा (अळ्या) झाडावर सोडतात. एप्रिल-मेमध्ये दोन तृतीयांश प्ररोह नैसर्गिक रीत्या जुलैमध्ये कीटोत्पादन होण्यास ठेवतात; त्यानंतर पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपूर्ण नवीन वाढ काढतात. पळसावरचा किड्यांचा पिलावा बोरीवर सोडता येतो; पण तो कोशिंबावर सोडत नाहीत

No comments:

Post a Comment

  HIGHEST FOREST PERCENTAGE STATE IN INDIA ( भारतातील सर्वाधिक वन टक्केवारी असलेले राज्य ) वनांचे जागतिक महत्व  (What is the Importance of...